मधुचंद्र – अत्तर भरल्या आठवणी

635

निशिगंधा आणि दीपक यांच्या 27 वर्षांच्या सहजीवनानंतरही मधुचंद्र तितकाच प्रफुल्ल… टवटवीत आहे.

मधुचंद्र म्हणजे – मनाच्या कुपीत अत्तरासारखा साठवण्यासारखा क्षण.

फिरायला कुठे गेला होतात ? आमचं लग्न गोव्यात मंगेशीच्या देवळात साध्या पद्धतीने झाले. मंगेशी हे आमचं कुलदैवत असल्याने मंगेशीच्या देवळात मंगेशीच्या साक्षीने साधंसोपं लग्न केले. त्यावेळी सुट्टीही चार दिवसांची असल्याने फिरायला गोव्यालाच गेलो होतो.

तिथे आवडलेले ठिकाण? – गोव्याला मी बऱयाचदा गेले आहे. त्यामुळे गोव्यात पाहिले नाही असे काहीच नाही, पण मला तिथे मंगेशीचे देऊळ फार आवडलं होतं आणि आवडतं. माझी अत्यंत आवडती, सुशांत, स्वतःशी संवाद साधण्याची, सात्त्विक विशुद्ध जागा आहे ती.

ठिकाणाचे वर्णन – गोव्याची माणसं, गोव्यातले राहणीमान, तिथलं खाणं, तिथली हवा, वातावरण आवडतं.

तिथे केलेली शॉपिंग – नाही. मुळात मी शॉपहोलिक नाही आहे. मला दागिने, कपडय़ांचा अजिबात सोस नाही. मी तिथे सगळ्यांसाठी काजू, कोकम असे खाद्यपदार्थ घेतले होते.

काही खास क्षण- तिथली मांडवी नदी. लग्न झालं आणि आम्ही त्या मांडवी हॉटेलमध्ये गेलो. काय तो देखावा होता. त्या सबंध काचेतून ती मांडवी नदी दिसत होती. ते जे ताऱयांनी भरलेले आभाळ होतं त्या वेळेला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत होते. ती आठवण अतिशय मनामध्ये बिंबित आहे. कारण त्यावेळचे चांदणे फक्त आभाळात नव्हते ते माझ्या मनाच्या ओंजळीतही होतं.

मधुचंद्र हवाच की… – मला असं वाटतं की, रोज मितीच्या, परीटघडीच्या अत्यंत स्पर्धात्मक आयुष्यामध्ये जिथे ‘तो’ आणि ‘ती’ ही समप्रमाणं संसाराच्या गाडय़ाची चाकं झाली आहेत. तिथे असे मोजके दिवस प्रत्येक वर्षी, प्रत्येक कुटुंबाने घ्यावे. पहिले तर जोडीदाराने आणि कुटुंबवत्सल झाल्यावर कुटुंबाने त्या मुलांसकट. कारण कुठेतरी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या सहचारासोबत, सहचारिणीसोबत जगाला विसरून घालवलेले हे दिवस नात्याला संजीवनी देतात. दीपक, मी आणि ईश्वरी आम्ही हे पाळतो. आमची एक सुट्टी तिघांची असते आणि एक सुट्टी आई-बाबांबरोबर असते. नाती ही आता डिजिटल झाली आहेत, ती स्पर्शाची राहणं गरजेचे आहे.

एकमेकांशी नव्याने ओळख – त्या वेळेला जसा समोरचा कळतो तसा स्वतःही स्वतःला कळतो. आपल्या शेजारी झोपणारा सहचर इतका घोरतो हे तरी आधी कुठे माहीत असते.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – एकमेकांना ओळखण्यासाठी कित्येक वेळेला माणसाला सरणावर झोपेपर्यंत स्वतःलाही ओळखता येत नाही. एकमेकांना दोष न लावता आयुष्य साधंसोपं जगलं पाहिजे. मलाच सगळं येतं, मी म्हणेन तेच हे नात्यात ठेवू नये. जगा आणि जगू द्या या तत्त्वानुसार जगलात तर मला वाटतं नाती टिकतील. नात्यात निरागसता हवी.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – तिथले मासे फार आवडले होते, विशेष करुन कोळंबी. पण गेली दहा वर्षे मी शुद्ध शाकाहारी झाले.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – जागा आणि भावना याचं साधर्म्य जोडावं म्हणून जुळवावं लागत नाही, तर नवीन जागाच मला प्रेम करायला भाग पाडते यातला भाग नाही किंवा नवीन जागी मला प्रेमच उफाळून येईल आणि जागा न बघता प्रेमाच्या गप्पा मारायला लागेन असे नाही. नवीन जागा नव्याने भेटावी तसे नात्यानेही सतत नव्याने भेटावे त्याला जागेचा निकष असू नये.

जोडीदाराची खास आठवण? – एकमेकांवरचा प्रचंड विश्वास. आमच्या लग्नाच्या वेळी नाव घेताना दीपक इतका भांबावून गेला होता की, तो नावच चुकला. त्याचं नाव देवदत्त. लग्न शास्त्र्ाशुद्ध करताना आहे तेच नाव असावं असं होतं त्यामुळे त्याला दोनदा करेक्ट केले. तेव्हा त्याची फार गंमत वाटली.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – आम्ही अजूनही मित्र आहोत आणि दोघंजण काही बाबतीत एकमेकांशी टोकेरी अजूनही होतो. हे प्रमाण आहे की, आम्ही अजूनही एकमेकांचा विचार करतो. ज्या वेळेला स्वतःचा स्वतंत्र निर्णय, स्वतःचे मत कितीही वर्षे लग्नाला झाली तरी मांडू शकतो. तुमच्यात मतभेद होऊ शकतात. तेव्हा नातं अजून श्वास घेतंय असं समजायचं. आमच्यात अजून ती आहे. दीपक माझ्यावर दिलखुलास प्रेम करतो, विश्वास ठेवतो हे मला आवडंत. जे करतो ते मनापासून करतो तेच मला आवडतं.

आपली प्रतिक्रिया द्या