विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा

अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात वाळुंज बायपास ते सारोळा बद्धी बायपास दरम्यान विनापरवाना घोडागाडी (टांगे) शर्यत भरविल्याप्रकरणी चौघा आयोजकांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण युवराज बेरड, अजय विलास जाधव, मनोज बारस्कर, शिवा राऊत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत. रविवार (दि. 31 ऑगस्ट) सकाळी नगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात वाळुंज बायपास ते सारोळा बद्धी बायपासदरम्यान घोडागाडी शर्यत भरविण्यात आली होती. यात 20 ते 25 घोडागाडय़ा, 100 ते 150 पशुपालक तसेच ही शर्यत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी शर्यत पुकारून रस्त्यावरून घोडागाडय़ा पळविल्या, यावेळी गाडाचालक घोडय़ांना चाबकाने मारून त्यांना क्रूरतेची वागणूक देत होते. तसेच या शर्यतीमुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांची अडचण झाली. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक तेथे गेले. त्यांनी आयोजकांना शर्यतीच्या परवानगीबाबत विचारणा केली असता, त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.