होतकरू : सौंदर्य आणि बुद्धिमत्ता

आर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावरही पौर्णिमा बुद्धिवंत हिने मनातली आवड जोपासलीच. सौंदर्यस्पर्धेत उतरून नाव कमवायचं होतं. ते तिने मिळवले. आर्किटेक्चरचे शिक्षण तिने पूर्ण केले आणि आता ती लालबाग येथे जॉब करतेय. पौर्णिमा यातूनही मॉडेलिंगमध्येही व्यस्त आहे.

आर्किटेक्चरचे शिक्षण झाल्यावर पौर्णिमाने सहज म्हणून एक मॉडेलिंगचा प्रोजेक्ट केला. लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद आला. तेव्हा तिला सौंदर्य म्हणजे केवळ रंग वा उंची नसून तरुणीमधील आत्मविश्वास आहे हेही तिला कळलं. ती म्हणते, आपली आवड जोपासण्यातूनच स्वत:ला शोधण्याची माझी धडपड सुरू झाली. लोकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अजून काही मॉडेलिंगचे प्रकल्प केले. ‘मिस महाराष्ट्र 2018’ची अंतिम स्पर्धक म्हणून माझी निवड झाली. आता एकाच वेळी ‘टीजीपीसी मिस इंडिया 2019’ ही ऑनलाइन स्पर्धा आणि ‘मिस इंडिया एक्सक्कीसिट’ या दोन स्पर्धांसाठी तिची निवड झाली.

पौर्णिमाने सौंदर्य स्पर्धांमध्ये आतापर्यंत बरीच पारितोषिके मिळवली आहेत. यातच ‘मिस इंडिया एक्सक्कीसिट’ मध्ये अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. ‘टीजीपीसी मिस इंडिया (सीझन 6)’ या ऑनलाईन स्पर्धेत तिची अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. ‘मिस महाराष्ट्र 2018’ची ती अंतिम स्पर्धक आहे. मीडिया स्टुडेंट आर्किटेक्चर आणि डिझाईन अवॉर्ड 2018 या स्पर्धेत आर्किटेक्चरच्या प्रकल्पाला तिला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

मराठी सिनेमात काम करायचंय

आपली महत्त्वाकांक्षा सांगताना पौर्णिमा म्हणते, आर्किटेक्चर आणि मॉडेलिंग या दोन्ही गोष्टींसाठी मी तितकीच मेहनत घेतली आहे. पण त्यातूनच मी पोहायलाही शिकले आहे. कॉलेजमध्ये असताना माझं आर्किटेक्चरचं कामही नेहमी नावाजलं जायचं, यामुळे पुढे भविष्यात मला आर्किटेक्चरच्या क्षेत्रातच काम करायचे आहे. म्हणजे पर्यावरणाला धरून असलेले काम करायला मला आवडेल. मॉडेलिंगविषयी म्हणाल तर काही लघुपटांसाठी ऑडिशन दिलं होतं, पण अजून सिलेक्शन झालेलं नाही. मी तसं पाहिलं तर सोशल वर्कर आहे. त्यामुळे एखाद्या मराठी चित्रपटात सामाजिक विषयाला धरून काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी चांगल्या संधीची वाट बघतेय.

आपली प्रतिक्रिया द्या