
म्हाडा मुख्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी ‘म्हाडा’तर्फे 164 सेवा निवासस्थानांचे वाटप करण्याचा निर्णय म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला. 164 सेवा निवासस्थानांपैकी घाटकोपर येथे 80 सेवा निवासस्थाने, मुंबई सेंट्रल येथे 57 सेवा निवासस्थाने व शीव प्रतीक्षा नगर येथे 27 सेवा निवासस्थाने आहेत. या निर्णयामुळे म्हाडाच्या मुंबईस्थित कर्मचाऱयांना जणू दिवाळी भेट मिळाली आहे.
याबाबत अनिल वानखडे म्हणाले, ‘म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी मुंबईमध्ये बदली होऊन नियुक्त होतात. तसेच सरळ सेवा भरतीतही कर्मचाऱयांची नियुक्ती मुंबई मुख्यालयात केली आहे. मुंबईमध्ये भाडेतत्त्वावर घर घेणे तृतीय श्रेणीतील कर्मचाऱयांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई, विरार येथे वास्तव्यास होते. कार्यालयात येण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत असल्याने या कर्मचाऱयांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. ही बाब विचारात घेऊन सेवा निवासस्थान देण्याचा निर्णय घेतला.






























































