T20 WC हिंदुस्थानला अजूनही सेमीफायनल गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकामध्ये हिंदुस्थानला सलग दोन पराभव स्वीकारावे लागले. ज्या संघाला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते तोच संघ आता स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याच्या स्थितीत आला आहे. पहिल्या लढतीत पाकिस्तानने 10 विकेट्सने आणि दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने 8 विेकेट्सने मात दिल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा संघ अडचणीत सापडला आहे.

हिंदुस्थानचा संघ ग्रुप-2 मध्ये आहे. या ग्रुपमधील पाकिस्तानने तीन विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानासाठी सध्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हिंदुस्थानचा संघही या रेसमध्ये आहे. हिंदुस्थानने तीन लढती खेळायच्या आहेत. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या हिंदुस्थानला अजूनही सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. 2007 चा विजेत्या असणाऱ्या हिंदुस्थानला सेमीफायनलला कसे पोहोचता येईल ते पाहूया..

1. हिंदुस्थान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आपल्या ग्रुपमधील स्कॉटलंड आणि नामेबियाचा पराभव करावा. असे झाल्यास पाकिस्तानचे 10 गुण होतील आणि हा संघ पहिल्या स्थानावर जाईल. दुसऱ्या स्थानासाठी हिंदुस्थान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये रस्सीखेच सुरू होईल.

2. जर हिंदुस्थानचा संघ अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यास विराटसेनेचे आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर न्यूझीलंड-अफगाणिस्तानच्या लढतीत विजयी होणारा संघ पाकिस्तानसोबत सेमीफायनलला जाईल.

3. जर हिंदुस्थानचा संघ अफगाणिस्तानला मात देऊ शकला तर विराटसेनेचे 6 गुण होतील. दुसरीकडे अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केल्यास हिंदुस्थानचा संघ सेमीफायनलला जाईल.

4. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले आणि हिंदुस्थानने अफगाणिस्तानला पराभूत केले तर तिन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण होतील. अशा स्थितीत रनरेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ निवडला जाईल.

5. हिंदुस्थानचा रनरेट सध्या खऱाब आहे, मात्र विराटसेनेने नामेबिया आणि स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला तर सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा आणखी उंचावतील.

ना गेम प्लॅन, ना जिंकण्याची जिद्द! माजी वेगवान गोलंदाज टीम इंडियावर भडकला

ग्रुप-2 मधील सामने

हिंदुस्थान – 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तान. 5 नोव्हेंबरला स्कॉटलंड आणि 8 नोव्हेंबरला नामेबियाशी भिडणार
पाकिस्तान – 2 नोव्हेंबरला नामेबिया आणि 7 नोव्हेंबरला स्कॉटलंडशी भिडणार
न्यूझीलंड – 3 नोव्हेंबरला स्कॉटलंड, 5 नोव्हेंबरला नामेबिया आणि 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी भिडणार
अफगाणिस्तान – 3 नोव्हेंबरला हिंदुस्थान, 7 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी भिडणार