
बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. लहानांपासून वृद्धांपर्यंत बदाम खायला सगळ्यांनाच आवडत असला, तरीही बदाम खाण्याची व्यक्तिपरत्वे पद्धत वेगळी असू शकते. काहींना भिजवलेले, काहींना कच्चे, तर काहींना रोस्टेड बदाम खायला आवडतात. उन्हाळ्यात कच्चे बदाम खाल्ल्याने शरीराची उष्णता वाढू शकते तसेच पित्तही होऊ शकते. त्यामुळे अंगावर पुरळ येणे, मूळव्याध यासारख्या समस्या वाढतात. याकरिता या दिवसांत रात्रभर भिजवलेले बदाम खावेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
बदामामध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ऍसिडसारखी आवश्यक पोषक तत्त्वे असतात. दररोज भिजवलेले बदाम खाणे आरोग्यदायी आहे. जाणून घेऊया उन्हाळ्यात बदाम किती खावेत आणि कसे खावेत.
भिजवलेले बदाम का खावेत ?
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या वाढतात. कच्चे बदाम खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.त्यामुळे कच्चे बदाम खाण्याऐवजी भिजवलेले बदाम खा. भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात याशिवाय शरीरातील उष्णताही कमी करतात. बदाम भिजवल्याने पित्तदोषाची समस्या कमी होते. यासह पचनाच्या समस्याही दूर होतात.
बदामाची साल काढा
भिजवलेल्या ताज्या बदामाची साल काढून खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते. त्यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण रोखले जाते.
केस व त्वचेसाठी फायदेशीर
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बदामामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असते. सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्यास दिवसभर जास्त भूक लागत नाही.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळते. बदाम खाणे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
दररोज किती बदाम खावेत ?
दररोज भिजवलेले 2 बदाम खावेत. त्यापेक्षा किती दिवसांनी किती बदाम खावेत हे प्रमाण व्यक्तिच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे असू शकते. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.