
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे कशी काम करतात याची तोंडओळख व्हावी यासाठी सलाम बॉम्ब फाऊंडेशन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईतील शाळांमध्ये शिकणाऱ्या ७ ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना माध्यमे कशी काम करतात याची या विद्यार्थ्यांनी मॉडेल्स आणि इतर साहित्याच्या माध्यमातून माहिती दिली. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यातील एक प्रदर्शन नुकतेच ना.म.जोशी शाळेच्या सभागृहात पार पडले. या प्रदर्शन मालिकेतील अखेरचे प्रदर्शन चेंबूरमध्ये भरवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनासाठी आधी विद्यार्थ्यांना बातमी तयार कशी करतात आणि बातमीदाराचे काम काय याची माहिती देण्यात आली. याशिवाय फोटोग्राफी, निवेदनाबाबतचीही माहिती देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लेखन,वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठीही प्रदर्शनाद्वारे प्रयत्न करण्यात आले.
























































