
घरी असल्यावर आपल्याला नवनवीन पदार्थ बनवण्याची इच्छा होते. अशावेळी प्रत्येकवेळी तोच तो पदार्थ करण्यापेक्षा, आपण काहीतरी नवीन करुन बघायला हवं. कडधान्य खाण्यासाठी घरातील लहान मुलं नाक मुरडतात. याच कडधान्यापासून आपण काहीतरी नवीन पदार्थ करुन बघायला हवा. कडधान्यापासून आपण तयार करुया स्प्राऊटस् फलाफल.
साहित्य
स्प्राउट्स ( भिजवलेले काबुली चणे, मोड आलेले मुग, मोड आलेले मटकी,)
कोथिंबीर
ओवा
लसूण
भाजलेले जिरे पावडर
काळी मिरी पावडर
लाल मिरची पावडर
ब्रेड क्रंब्स
बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
आवश्यकते नुसार तेल
स्प्राउट्स फलाफल बनवण्याची कृती
सर्वप्रथम, मिक्सरमध्ये स्प्राउट्स घाला आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर, कांदा,ओवा हे सर्व बारीक करा. लक्षात ठेवा की जास्त बारीक करू नका, ते थोडे जाडसर ठेवा. त्यानंतर लसूण, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, लाल मिरची (कमी मसालेदार) आणि मीठ घाला. नंतर पुन्हा एकदा बारीक करा. यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स होतील.
जेव्हा तुम्ही सर्व गोष्टी बारीक कराल तेव्हा त्या एका भांड्यात काढा आणि त्यात ब्रेडक्रंब तसेच बेकिंग सोडा घाला. सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर, बाइंडिंग व्यवस्थित होत आहे की नाही ते तपासा म्हणजेच मिश्रण हातात घेतल्यावर लाडूचा आकार सहज घ्यावा, जर नसेल तर गरजेनुसार आणखी काही ब्रेडक्रंब घालू शकता.
मिश्रण तयार झाल्यानंतर, एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात स्प्राउट्स फलाफेल हलक्या अंडाकृती आकारात एक-एक करून मध्यम आचेवर तळा. यामुळे तुमचे फलाफेल हळूहळू तपकिरी होतील आणि ते आतून चांगले शिजले जातील.
तुम्ही हे फलाफेल तिखट पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता आणि मुलांसाठी गोड चटणीसोबत सर्व्ह करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही पावसाळ्यात कुरकुरीत देसी ट्विस्टसह हा मिक्स स्प्राउट फलाफेल स्नॅक घरच्याघरी ट्राय करू शकता.