
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (एनआरसी) विरोधात देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये होणारी निदर्शने आणि त्यावरून केल्या जाणार्या राजकारणावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी चिंता व्यक्त केली. ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे मात्र शैक्षणिक संस्थांना राजकीय आखाडा बनवू नये, असे वक्तव्य पोखरियाल यांनी केले.
राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकास स्वातंत्र्य आहे, मात्र महाविद्यालय आणि विद्यापीठांना याचे केंद्र बनू देऊ नये. विद्यार्थी याठिकाणी शिवण्यासाठी येतात, ते देशाची आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असे पोखरियाल यांनी म्हटले.
अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करीत आहेत. या कायद्याबद्दल विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही पोखरियाल यांनी केला. काँग्रेस धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्यास जबाबदार आहे. काँग्रेस सीएएविरोधात गैरसमज पसरवत आहे, असेही ते म्हणाले.
ममतांनीही नागरिकत्व कायद्याची केली होती मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर रमेश पोखरियाल यांनी टीका केली. ममता जेव्हा 2005 मध्ये तृणमूलच्या खासदार होत्या, तेव्हा त्यांनी देशाबाहेरून येणार्या लोकांविरोधात आंदोलने करून नागरिकत्व कायद्याची मागणी केली होती, याची आठवण पोखरियाल यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, फाळणीच्या वेळी पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन 23 टक्के होते. आज ती संख्या 3 टक्के इतकी कमी झाली आहे. काय झाले या लोकांचे, असा सवालही त्यांनी केला.


























































