स्वप्नील चव्हाण यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट ५ ऑक्टोबरला झळकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुखेड

मुखेड तालुक्यातील उजाड माळरान डोंगराच्या दऱ्या खोरीत नापिकी दुष्काळी पाणी टंचाईच्या परिस्थितीने हैराण झालेल्या तालुक्याचा भूमिपुत्र स्वप्नील चव्हाण आता चित्रपट क्षेत्रात पर्दापण करत असून, त्यांच्या निर्मितीतून ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट साकारला आहे. ५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

तालुक्याचे भूमिपुत्र उद्योजक स्वप्नील चव्हाण यांनी खते निर्मिती कारखाना नंतर सहकार साखर कारखाना चालविला उद्योग क्षेत्रातून हळूच त्यांनी आपला मोर्चा मराठी चित्रपट सृष्टीकडे वळविला आहे. आपल्या सहकारी तीन मित्रासह त्यांचा निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट हृदयात समथिंग समथिंग हा येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, अतुल गुगळे या मित्रांसह परदेश दौऱ्यावर गेलो असता तिथे चित्रपट निर्मितीसाठी प्रेरणा मिळाली व मराठी चित्रपट निर्मितीकडे आम्ही वळलो. अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेसह अनिकेत विश्वास राव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, अमिता कुलकर्णी, भूषण कडू, आनंदा कारेकर या कलाकारांचा हा चित्रपट आहे.

यात विशेष म्हणजे मुखेड तालुक्यातील सकनूर तांडा जवळील विशाल राठोड या कलाकाराला या चित्रपटात संधी मिळाली आहे तर नायगाव येथील रामेश्वर भालेराव ज्यु जॉनी लिव्हर यांना पण संधी देण्यात आली आहे. इंग्रजी हॉलीवूड हिंदी बॉलिवूड आणि आंध्र येथील टॉलीवूड या सिनेमाच्या भाऊगर्दीत मराठी सिने चित्रपटसृष्टीला बुरे दिवस आले असून अवकळा आली आहे. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी मनोरंजनासाठी मराठी संस्कृती टिकली पाहिजे म्हणून मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट आवर्जून पाहावेत असे ते म्हणाले.

गोवा, मुंबई आणि पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, चित्रपट निर्मिती केल्यानंतर प्रदर्शित करण्यासाठी खूप अडचणी आणि मोठा खर्च करावा लागत असतो.

२८६ सिंगल स्क्रीनवर दि. ५ रोजी शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत असून सर्वांनी पाहावे असे ते म्हणाले. मुखेड तालुक्यातील नागरिकांत आपल्या भूमीपुत्राचा निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी काळात मराठी टीव्ही मालिकासह आणखी काही आगळे वेगळे हलके फुलके चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नातू असलेल्या व सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शेषेराव चव्हाण यांचे सुपूत्र असलेल्या स्वप्नील चव्हाण यांनी राजकारणात यशस्वी पाऊल टाकले होते. त्यांच्या सौभाग्यवती वैशाली चव्हाण या नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील राहिल्या आहेत. आता त्यांनी चित्रपट क्षेत्रात टाकलेली उडी ही नांदेड जिल्ह्यासाठी नव्हे तर मराठवाड्यासाठी देखील अभिमानास्पद आहे.