जनसागर नतमस्तक! शिवतीर्थ गहिवरले!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजही आपल्यात आहेत. तमाम हिंदू आणि मराठी माणसाला त्यांच्या विचारांतून सदैव स्फूर्ती मिळत असते. त्यांच्या आठवणी चैतन्य जागवतात. स्वाभिमानाने जगण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. याच भावनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी त्यांना मानवंदना देण्यासाठी लाखोंचा भक्तिसागर शिवतीर्थावर लोटला होता. मुंबई, महाराष्ट्राबरोबरच हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी आपल्या लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. त्यांना आदरांजली वाहताना अवघे शिवतीर्थ गहिवरले.

शिवसेनाप्रमुखांचा शनिवारी सहावा स्मृतिदिन. या स्मृतिदिनी आपल्या दैवताच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच शिवतीर्थावर रीघ लागली होती. एस.टी., रेल्वे, खासगी गाड्या, मिळेल त्या वाहनाने शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले. शिवतीर्थावर घुमलेला बाळासाहेबांचा बुलंद आवाज, सभांसाठी उसळणारा जनसागर अशा सर्व आठवणींना उजाळा देत गहिवरलेल्या अंतःकरणाने शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक झाले. तळपत्या उन्हातही स्मृतिस्थळी माथा टेकविण्याची ओढ गर्दीला होती. शिस्तीनेच प्रत्येक जण पुढे सरकत होता. स्मृतिस्थळावर लागलेली ही रीघ रात्री उशिरापर्यंत कायम होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर दाखल होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ या घोषणांनी आसमंत निनादला. या जयघोषातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवसैनिकांची मुंबईतील शिवसैनिकांकडून तितकीच काळजी घेण्यात आली. शिवतीर्थावर येणारा एकही जण उपाशीपोटी परतू नये यासाठी ठिकठिकाणी अल्पोपाहाराचे स्टॉल उभारण्यात आले. उपमा, कांदेपोहे तसेच दुपारच्या सुमारास जेवणाची व्यवस्था या शिवसैनिकांसाठी करण्यात आली.

मान्यवरांची आदरांजली
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सुरेश प्रभू, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार पूनम महाजन, आमदार भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, भाई गिरकर, निरंजन डावखरे, उद्योजक विठ्ठल कामत यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तिकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ, खासदार चंद्रकांत खैरे, उपनेते खासदार अरविंद सावंत, अनंत तरे, विजय कदम, सूर्यकांत महाडिक, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, मीना कांबळी, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, सुरज चव्हाण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, दादा भुसे, अर्जुन खोतकर, खासदार राहुल शेवाळे, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार ऍड. अनिल परब, सुनील प्रभू, सुनील राऊत, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, सुनील शिंदे, रवींद्र फाटक, अजय चौधरी, तृप्ती सावंत, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, उपनेते नितीन बानगुडे-पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, रमेश कोरगावकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, मंगेश सातमकर, राजेंद्र राऊत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी महापौर महादेव देवळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक तसेच युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्मृतिस्थळी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले.

शिवतीर्थ भगवे झाले
शिवतीर्थाकडे येणारा प्रत्येक रस्ता भगवामय झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा झळकणारे भगवे झेंडे आणि भगवा पटका, भगवी उपरणी, हाती भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक दाखल होत होते. आबालवृद्ध, महिला आणि वाघाची निशाणी असलेल्या लांबच लांब पताका यांनी शिवतीर्थ भगवेमय झाले.

मुख्यमंत्र्यांनीही केले अभिवादन; उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली.

भजनरूपी स्वरांजली
व्यसनमुक्ती जनजागृती मंडळ पेण, रायगड यांनी शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना भजनातून अभिवादन केले. शाहीर लवेंद्र मोकल यांनी आपल्या भजनातून शिवसेनाप्रमुखांचे कर्तृत्व मांडले. तसेच विविध गीतेही सादर केली.

मुबई मराठी पत्रकार संघाकडूनही मानवंदना
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे आजीव सदस्य होते. पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वनाथराव वाबळे यांच्या आग्रहावरून त्यांनीही हे आजीव सदस्यपद स्वीकारले होते. पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी पहिली 2 लाख 50 हजारांची देणगीही बाळासाहेबांनीच दिली होती. त्यांचे हे पत्रकारितेविषयीचे प्रेम कधीही विसरता न येणारे. पत्रकार संघात अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी बाळासाहेबांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिकांनी शिवतीर्थावर हजेरी लावली होती. विदर्भ, मराठवाड्यातून रेल्वेने आलेल्या शिवसैनिकांनी तर भल्यापहाटेच स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. तसेच शिवसेना नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि पालघर जिह्यातून पाच हजारांहून अधिक शिवसैनिक शिवतीर्थावर आले होते. दादर टीटीपासून शिवतीर्थापर्यंत मोठ्या शिस्तीत त्यांनी काढलेल्या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते मोफत बिस्किट व पाणीवाटप करण्यात आले. यावेळी सत्यवान जावकर, हेमंत कदम, प्रकाश वाघधरे, अजय राऊत, रंजना नेवाळकर, रचना अगरवाल, महेश गुरव, अतुल केरकर, रामचंद्र लिंबरे, शिल्पा पोवार, संदीप तांबे, अरविंद नागनुरी, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनाप्रेमी आणि शिवसैनिक आले होते. त्यात वृद्ध महिलांचाही सहभाग होता.