दादर, लालबाग मार्केटमध्ये तुफान गर्दी

file photo

बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दादर, लालबाग, परळ, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, बोरिवली, घाटकोपर अशा विविध मार्केटमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. आधीच गर्दी त्यात अधूनमधून पडणाऱया पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.

दादर आणि लालबाग मार्केटमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. गर्दीमुळे दादर स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुल मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागत होता. वाढत्या मागणीमुळे एरव्ही 30 रुपये किलो दराने मिळणाऱया झेंडूसाठी 100 रुपये मोजावे लागत होते. जास्वंद आणि चाफ्यानेदेखील चांगलाच भाव खाल्ला. सजावटीसाठी इकोफ्रेंडली मखरकडे नागरिकांचा ओढा होता.