
सामना प्रतिनिधी । धुळे
थंडीचा कडाका ओसरला असून आता तडाका देणारे ऊन अनुभवले जात आहे. त्याचवेळी बाजारात रसाळ आणि पाणीदार टरबुजे आली आहेत. जिल्ह्यातीलच काही शेतकर्यांनी पीक पद्धतीत बदल करीत टरबुजांचे उत्पादन घेतले आहे. सध्या जास्तीत जास्त चार रुपये प्रतिकिलो दराने टरबुजांची मागणी होते. टरबुजाची लागवड, वेळोवेळी देखरेख, पाणी भरणे यावर मोठा खर्च येतो. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकर्यांना चांगला दर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकर्यांची आहे.
हिवाळा संपत आला असून या आठवड्याच्या प्रारंभापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. अवघ्या काही दिवसांतच शहर आणि जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 37 अंश सेल्सियसकडे झेपावला आहे. तडाखा देणार्या उन्हामुळे कोरड पडू लागली आहे. अशा परिस्थितीत शरीरातील तापमान राखणे, पाण्याचे प्रमाण राखणे, सारखेचे प्रमाण राखणे यासाठी रसाळ फळे येऊ लागतात. पीक पद्धतीत बदल केलेल्या शेतकर्यांनी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत टरबूज उत्पादनाला सुरुवात केली आहे. तडाखा वाढताच शेतकर्यांनी शहरात टरबूज विक्रीसाठी आणले आहेत. धुळे शहरातील जेल रोडवर टरबुजांचे ढिगारे घेऊन शेतकरी स्थिरावले आहेत, पण सध्या ग्राहक टरबूज खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर आलेले नाहीत. केवळ चार रुपये प्रतिकिलो दराने टरबूज विकला जात आहे. एक एकर क्षेत्रात टरबुजाचे उत्पन्न घ्यायचे असेल तर 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. तेव्हा टरबूज उत्पादकांना समाधानकारक दर मिळायला हवा. सध्याच्या दरात टरबूज विकले तर शेतकर्यांच्या हाती काही येणार नाही असे टरबूज उत्पादक शेतकर्यांचे म्हणणे आहे.
उन्हाची तीव्रता जसजशी वाढेल त्या प्रमाणात टरबूज आणि इतर रसाळ फळांची मागणी वाढेल. साहजिकच टरबुजांचे दर वाढतील. शेतकर्यांना त्या परिस्थितीतच फायदा होऊ शकेल असे स्पष्टीकरण व्यापार्यांनी दिले. थोडक्यात, येणार्या काळात टरबुजांच्या किमती वाढल्यामुळे उत्पादक सुखावणार असले तर ग्राहक मात्र टरबूज महागल्याने नाराजीचा सूर लावेल.

























































