
राजेश देशमाने । बुलढाणा
सध्या संपूर्ण देशभर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु असून मतदार नोंदणीच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी कल्पक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे या वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे. असाच आगळावेगळा अभिनव कार्यक्रमात पाच हजार शालेय विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी हिंदुस्थान निर्वाचन आयोगाच्या बोधचिन्हाद्वारे १३ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार येथे साकारणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.
हिंदुस्थान निर्वाचन आयोग १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर मतदार नोंदणी करत आहे. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी कोणीही १८ वर्षावरील मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवित आहे. यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. बुलढाणा तहसील अंतर्गत महिला बचतगट मार्फत मतदार नोंदणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंध अपंगाची सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. पथनाट्याद्वारे जनजागृती चौकाचौकात सुरु आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाच हजार शालेय विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता बुलढाणा जिजामाता प्रेक्षागार मैदानावर साकारणार आहे. यामध्ये बुलढाण्यातील हिंदुस्थान विद्यालय, प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड विद्यालय, शारदा कॉन्व्हेंट, सहकार विद्या मंदिर, उर्दु हायस्कूलचे मुले ही रांगोळी साकारणार आहे.
हिंदुस्थान निर्वाचन आयोग व बोधचिन्हामध्ये ही रांगोळी साकारण्यात येणार असून निवडणूक आयोगाचे घोषवाक्य व चिन्ह असलेले टीशर्ट व टोप्या परिधान करणार आहे. यासाठी हिंदुस्थान विद्यालयाचे शिक्षक सदानंद केणे हे मेहनत घेत असून पाच हजार मुलांना टोप्या व टि शर्ट पुरविण्यासाठी एचडीएफसी बँक, चिखली अर्बन बँक, अंबिका अर्बन, वर्धमान अर्बन, पंजाब नॅशनल बँक यांनी सहकार्य केले आहे. बुलढाण्यात पहिल्यांदाच मतदार नोंदणीच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी साकारत असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी देवून बुलढाणा व परिसरातील जनतेने १३ ऑक्टोबर रोजी ही मानवी रांगोळी पाहण्यासाठी सकाळी आठ वाजता जिजामाता पे्रक्षागार येथे यावे असे आवाहन केले आहे.































































