समुद्री वादळ स्थितीमुळे मासेमारी ठप्प, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पावसाचा जोरही वाढला 

528
प्रातिनिधिक फोटो

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिमाण म्हणून पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टी भागात पावसाचे धुमशान सुरू आहे.

दरम्यान, मासेमारी नौका सुरक्षित बंदरात स्थिरावल्या आहेत. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला असून मासेमारी ठप्प झाली आहे. गेले काही दिवस मच्छीमारांच्या जाळीत सर्व प्रकारची अपेक्षित मासळी मिळत होती. चार पैसे हाती मिळत असल्याने दिवाळी उत्सव आनंदात जाणार या तयारीत असलेल्या मच्छीमारांच्या आनंदावर पावसाने विरझन ओतले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर अधिकच वाढत आहे. सिंधुदुर्गात मालवण तालुक्यासह अन्य भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस कोसळत आहे. अवकाळी स्वरूपातील या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे. 24 रोजी होणार्‍या मतमोजणीवर पावसाचे सावट आहे.

दिवाळीच्या उत्साहावर पावसाच्या सरी 

25 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे. दिवाळी उत्सवातही पावसाचे विघ्न असण्याची शक्यता आहे. हवामान विभागानेही अजून काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहिल अशी शक्यता वर्तवली आहे. एकूणच अवकाळी स्वरूपातील या पावसाने उत्सवाच्या उत्साहावरही पाणी फिरवण्याची तयारी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या