सनम बेवफा! लग्नाच्या आठच दिवसांत पती प्रेयसीसोबत फरार, स्वतःच फोन करून कळवलं!

3767

लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न बघणाऱ्या एका नववधुला सोडून आठच दिवसात तिचा पती फरार झाल्याची घटना घडली आहे. आपण फरार होत असल्याची माहिती त्यानेच फोन करून तिला सांगितल्याचीही माहिती मिळत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे घडली आहे. या गावात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न आठ दिवसांपूर्वी सिराज नावाच्या तरुणाशी झालं होतं. लग्न झाल्यावर कोणत्याही सर्वसामान्य घरात घडतं, त्याप्रमाणे ही तरुणी सासरी रुळायचा प्रयत्न करू लागली. पण, रविवारी अचानक तिचा नवरा सिराज गायब झाला. सगळीकडे त्याचा शोध घेण्यात आला. काहीतरी अनिष्ट घडलं असावं, या काळजीने त्याचे कुटुंबीय चिंतेत पडले. आजूबाजूच्या गावात शोध करण्यास सांगूनही काहीच उपयोग झाला नाही.

अखेर दुपार उलटून गेल्यानंतर या तरुणीला एक फोन आला. तो फोन तिचा नवरा सिराज यानेच केला होता. त्याने तिला सांगितलं की, तो स्वखुशीनेच ते घर सोडून त्याच्या प्रेयसीसोबत पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा शोध करण्यात येऊ नये. त्याचं बोलणं ऐकताच ती तरुणी बेशुद्ध होऊन कोसळली. शुद्धीवर येताच तिने तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

या प्रकरणात सिराजचा एक मित्रही सामील असल्याचं वृत्त आहे. या साथीदाराचा शोधही सुरू असून पत्ता लागताच त्या दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या