
पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना आज वरळी परिसरात घडली. राज मनोहर नामपेलली आणि लता मनोहर नामपेलली अशी मृतांची नावे आहेत. गोळीबाराचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वरळी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले आहेत.
राज नामपेलली हे वरळीच्या एका खासगी इमारतीत पत्नी, मुलगा आणि सुनेसोबत राहत होते. ते पूर्वी कतार येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर ते मुंबईत आले. त्यांना आपल्या मुलाने मोठे नाव करावे आणि स्वतंत्र राहावे असे वाटत होते. त्याला लता यांचा विरोध होता असे सूत्रांनी सांगितले.
2023 मध्ये त्यांच्या मुलाचा विवाह झाल्यानंतर तो राज यांच्यासोबत राहत होता. शनिवारी दुपारी राज यांचा भाचा हा घरी आला होता. रात्री त्यांनी एकत्र जेवण केले. जेवण केल्यानंतर रात्री राज आणि लता या त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास लता या झोपल्या होत्या तेव्हा राज याने गावठी कट्ट्याने लता यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज आल्याने त्यांचा भाचा उठला. त्यानंतर राज हे बेडरूमबाहेर आले. शॉर्टसर्किट झाले असावे असे सांगून बॅग घेऊन ते घराबाहेर गेले. घराबाहेर गेल्यानंतर राज हे जिन्यावर बसले. जिन्यावर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत.