मिठीत घेऊन स्टंटचा केला बहाणा, धावत्या लोकलमधून पतीने पत्नीला ढकलले

file photo

कौटुंबीक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडली आहे. पूनम चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्ये प्रकरणी अन्वर अली शेखला वडाळा रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

अन्वर हा मानखुर्द परिसरात राहतो. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या दोघांत कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी दुपारी अन्वर अली हा पूनमला घेऊन मशीद बंदर येथे नातेवाईकांकडे गेला होता. नातेवाईकांची भेट घेतल्यावर दुपारी त्या दोघांनी मशीद बंदर येथून मानखुर्दला जाण्यासाठी लोकल पकडली.

लोकल चेंबूर स्थानकात पोहोचल्यावर अन्वर अली हा दरवाजाजवळील बांबूवर लटकून स्टंट करीत होता. त्याने पूनमला मिठीत घेऊन स्टंटचा बहाणा केला. गोवंडीदरम्यान त्याने पूनमला मिठीतून सोडल्याने ती लोकलखाली आली.

हा प्रकार एका दक्ष महिलेने पाहिला. गोवंडी स्थानक येताच तिने गस्तीवर असणाऱया पोलिसांना हा प्रकार सांगितला. गस्तीवरील पोलिसांनी अन्वर अलीला ताब्यात घेतले.  जखमी अवस्थेतील पूनमला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या