
रुसलेल्या बायकोला मनवायला गेलेल्या नवऱ्याला सासरच्यांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात पती गंभीर जखमी झाला नाही. मेहुल राठोड असं या माणसाचं नाव आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुलचा विवाह 2013मध्ये किंजल वाघेला हिच्याशी झाला. या दोघांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. सहा महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झालं होतं. किंजलला मेहुलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर किंजल माहेरी येऊन राहू लागली. मेहुलने तीन वेळा तिला सासरी आणण्याचे प्रयत्न केले. पण, दरवेळी किंजल नवनवीन अटी घालत होती. नोकरी करण्याची परवानगी, फिरायला घेऊन जाणे या अटी मेहुलने मान्य केल्या. पण, किंजलने मेहुलला त्याच्या आईशी कोणतंही नातं न ठेवण्याची अट घातली, ती मेहुलने अमान्य केली. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले.
मेहुल यानंतरही तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला. तिथे बोलणी फिसकटली. तिथून निघण्यापूर्वी लघवी करण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला तेव्हा त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याच्यावर रॉकेल ओतलं आणि आग लावली. त्याने तिथून पळून जाऊ नये म्हणून बाथरुमचा दरवाजाही बंद केला. मेहुलने स्वरक्षणासाठी बाथरुमचा दरवाजा तोडला आणि तो त्या घरातून बाहेर पडला. या दरम्यान झालेल्या ओरड्याने शेजारी जमा झाले. त्यांनीच जखमी झालेल्या मेहुलला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर मेहुलने सासुरवाडीच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे..




























































