फ्री गोवा टूर ऑफरपेक्षा कांद्याच्या ऑफरवर ग्राहकांच्या उड्या!

656

देशभरात कांद्याच्या किंमती वाढल्या असून काही ठिकाणी 1 किलो कांद्यासाठी नागरिकांना 200 रुपये मोजावे लागत आहेत. यापार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांप्रमाणेच हैदराबादमधील अभीबस.कॉम (abhibus.com) या तिकीटांची ऑनलाईन बुकींग करणाऱ्या कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चार वेगवेगळ्या ऑफर्स सुरू केल्या. त्यात त्यांनी कांद्याची ऑफरही ठेवली. त्याचप्रमाणे फ्री गोवा टूर, फ्री आयफोन आणि तीन किलो कांदा फ्री अशा ऑफर्स होत्या. गंमत म्हणजे ग्राहकांनी फ्री गोवा, आयफोनच्या ऑफरकडे पाठ फिरवत तीन किलो कांद्यांच्या ऑफरसाठी गर्दी केली. यामुळे दुकानदारासह कंपनीही चक्रावली आहे.

कंपनीची ही ऑफर सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर मजेशीर मीम्सही बनवले जात आहेत. सध्या कांद्याच्या भाव वाढल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कांदा हा रोजच्या जेवणात वापरला जाणारा पदार्थ असल्याने अभीबस.कॉम (abhibus.com) कंपनीने ऑफर्समध्ये कांद्याचाही समावेश केला. फ्री गोवा टूर, आयफोन या ऑफरकडे ग्राहक वळतील असा कंपनीचा अंदाज होता. पण ग्राहकांची पंसती तीन किलो कांद्याच्या ऑफरला होती. सुमारे 54 टक्के लोकांनी कांद्याची ऑफर स्विकारली. कंपनीच्या रोजच्या ऑफरमध्ये कांद्याची मागणी वाढत असल्याचे दुकानदाराने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या