
एमएचबी पोलिसांनी दहिसरच्या गणपत पाटील नगर येथील घरात असलेली हायड्रोपोनिक गांजाची लॅब उद्ध्वस्त केली. पोलिसांनी कारवाई करून हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करण्यासाठी लागलेली उपकरणे आणि रसायने जप्त केली. याप्रकरणी बब्बू सोनू कामतला एमएचबी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
दहिसरच्या गणपत पाटील नगर येथील एका घरात हायड्रोपोनिक गांजा उगवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. वरिष्ठ निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे, उपनिरीक्षक संदीप वत्रे, साळुंखे, ढामळे, पवार, म्हस्के, घाडगे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक गल्ली क्रमांक 4 येथे गेले. एका घरात छापा मारून हायड्रोपोनिक गांजाची लॅब उद्ध्वस्त केली.
पोलिसांनी त्या घरातून हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवलेली 179 रोपे, हायड्रोपोनिक लागवडीची उपकरणे, पाण्याची टाकी, पाण्याचा पंप, एअरचा चिलर, एअर पंडिशनर, फॅन, पीएच मीटर, टीडीएस मीटर, तापमान आणि ईसी मीटर, हवा खेळती ठेवण्यासाठी लागणारा पाइप, पीएचलो केमिकल बॉटल, पोटॅशियम क्लोराईड, बफर सोल्युशन असा 1 लाख 76 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवलेली जिवंत गांजाची रोपे किंमत 2 लाख 68 हजार आणि हायड्रोपोनिक लागवडीची उपकरणे, रसायने किंमत 1 लाख 76 हजार असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी बब्बू विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून बब्बूला अटक केली.


























































