
आम्ही मैदान सोडणारी माणसे नाहीत असे सांगतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी मांडली. भास्कर जाधव हे शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्याचे प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये जाहीर कार्यक्रमातून दिले. आपण शिवसेनेचेच आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार, असे त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगितले. 2024 ची विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे आपण उद्धव ठाकरे यांनाही सांगितले असल्याचे ते म्हणाले.
मंत्रीपदासाठी नाही, पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दासाठी लढतोय
‘21 जून 2023 ला सगळे गद्दार सुरतला पळाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. त्यावेळी बरेचसे आमदार भाजपाबरोबर जायला हवे असा सल्ला उद्धव ठाकरेंना देत होते. पण तुम्ही भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल, असे आपण सर्वांसमोर सांगितले होते. त्यावेळी सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहून भाजपाविरोधात लढू, असे उद्धव ठाकरे आपल्याला म्हणाले होते,’ असे भास्कर जाधव म्हणाले. आपण मंत्रीपदासाठी नाही तर पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दासाठी लढतोय, असेही ते म्हणाले.
बॅगा भरून पळायला मी गद्दार नाही
‘‘मी तपास यंत्रणांना घाबरत नाही. भाजपा नेत्यांनी माझा खून करण्याचे जाहीर सभेत म्हटले. त्यामुळे शेवटचे षड्यंत्र म्हणून मला बदनाम करण्याचे काम चालू आहे,’ असे भास्कर जाधव म्हणाले. पक्ष सोडून जाणे वगैरे आपल्या मनातही नाही, असे सांगतानाच, रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा गद्दार आहे का?’’ असा खोचक सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी मिंधे गटाला केला.



























































