
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘हे अजिबात गांभीर्य नसलेले गृहमंत्री आहेत’ अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ‘हे गृहमंत्री म्हणून आले की गुन्हे वाढतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. मी त्यांचा राजीनामा मागून थकले. कारण हे अजिबात गांभीर्य नसलेले गृहमंत्री आहेत.’
रासगरब्यात आधार कार्ड चेक करा ही भाजपच्या एका आमदाराने मागणी केली आहे. त्यावर बोलताना सुप्रिय सुळे म्हणाल्या की, ‘गृहमंत्रालयाला ससून ड्रग्ज प्रकरणात त्यांना वेळ नाही मात्र कोण कुठे जातं, काय खातं , कार करतं ही नको ती माहिती त्यांना हवी आहे. राज्यात मुली पळवल्या जातायत त्यात त्यांना रस नाहीये, जालन्यातील अमानुष घटनेत त्यांना रस नाहीये. जेलमधील लोकं मोकाट फिरतायत त्यात त्यांना रस नाही, मात्र आधार कार्ड चेक करण्यात त्यांना रस आहे. ‘ भाजपवर टीका करताना सुळे यांनी म्हटले की, भाजप एकीकडे आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी असल्याचा आरोप करत होती. तीच भाजप आमच्यासोबत चर्चेला बसत होती असा दावा करत आहे. आम्ही करप्ट होतो तर भाजप आमच्यासोबत चर्चेला कशी काय बसली ? भाजप धादांत खोटे बोलत असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागितली पाहिजे असे सुळे यांनी म्हटले.




























































