आयफोनच्या नादात गमावले लाखो रुपये, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लकी ड्रॉमध्ये आयफोन लागल्याची बतावणी करुन तरुणाला तब्बल सव्वा सात लाखांचा गंडा घातला. ही घटना हडपसरमधील काळेपडळमध्ये घडली आहे.

याप्रकरणी मुहमंद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट लालदित्सक, सूरज शर्मा, संजय चव्हाण, कृष्णा नकाशा यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मोहन भापकर (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हडपसरमधील काळेपडळ येथे कुटूंबियासह राहतात. काही महिन्यांपुर्वी आरोपी मुहमंद याने शुभमला मेसेज करुन आयफोन फोन लागल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने स्वतःची गॅझेट लिमीटेड कंपनी असल्याचे शुभमला सांगितले. मुहमंदने संबंधित कंपनीचे कागदपत्रे शुभमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले.

विश्वास बसल्याने शुभमने पहिल्यांदा 20 हजार रुपये संबंधिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर सातजणांनी वेळोवेळी शुभमला संपर्क करुन फोन कस्टममध्ये अडकल्याची माहिती देत रक्कम उकळली.

पैसे नसतानाही शुभमने मित्रांकडून उसने घेत संबंधितांच्या बँकखात्यावर वर्ग केले. सातत्याने पैशांची मागणी वाढल्यामुळे शुभमला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.