
हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांचा एकाच दिवशी मध्य प्रदेशात अपघात झाला. ‘सुखोई’ आणि ‘मिराज’ ही विमाने कोसळली. यात एका पायलटचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान सरावा वेळी ही दोन विमाने एकमेकांना धडकल्यामुळे भीषण अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवाई दलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्वालियर येथे हिंदुस्थानी हवाई दलाचा तळ आहे. हवाई दलाच्या पायलटकडून येथे नियमित सराव केला जातो. आज सकाळी सुखोई-30 आणि मिराज-2000 या विमानांनी उड्डाण केले. काही वेळानंतर दोन विमाने कोसळली.
उच्चस्तरीय चौकशी होणार
एकाच दिवशी दोन लढाऊ विमानांचा अपघात होण्याची ही गंभीर घटना असून हवाई दलाकडून उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना हवाईदल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी अपघाताबाबत माहिती दिली.
‘मिराज’चे अवशेष 90 कि.मी. दूर राजस्थानात पडले
सकाळी 10 ते 10.30च्या दरम्यान या दोन विमानांचा अपघात झाला. त्यांची एकमेकांना धडक झाली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सुखोई-30 आणि मिराज-2000 ही दोन विमाने पहाडगड परिसरात कोसळली. ‘मिराज-2000’चे काही अवशेष सिमेलगतच्या राजस्थानच्या भरतपूर परिसरात एका शेतामध्ये जाऊन कोसळले. त्यातील पायलटचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मोरेनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी दिली.
‘सुखोई’तील दोन पायलट जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ‘मिराज’च्या एका पायलटचा मृत्यू झाल्याचे हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.





























































