आयएएस अधिकाऱ्याने आपल्या मुलीला अंगणवाडीत केले दाखल, सरकारी शिक्षण व्यवस्थेबाबत गैरसमज दूर करण्यासाठी घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील चित्रकूट आयएएस अधिकारी पुलकित गर्ग यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला, सिया हिला, सरकारी अंगणवाडी केंद्रात दाखल केले आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पुलकित गर्ग म्हणाले की, “आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. सरकारी शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता सातत्याने सुधारली आहे. साधनसामग्रीची कोणतीही कमतरता नाही. जर एखादा आयएएस अधिकारी आपल्या मुलाला सरकारी संस्थेत शिक्षण देऊ शकतो, तर सामान्य पालकांनीही अजिबात संकोच करू नये” असे गर्ग म्हणाले.

गर्ग यांच्या मते, सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाबतची धारणा आता बदलत आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षित वातावरण आणि मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. लहान वयातील बालविकास अत्यंत महत्त्वाचा असून, या टप्प्यात आरोग्य, पोषण आणि संस्कार मुलांच्या आयुष्याची दिशा ठरवतात, असेही त्यांनी नमूद केले.

“अंगणवाडी केंद्रे आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण या बाबी प्रभावीपणे पुरवत आहेत. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते,” असे गर्ग यांनी सांगितले.

पुलकित गर्ग यांनी पालक, ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सामाजिक पूर्वग्रह दूर करून सरकारी शिक्षण व्यवस्थेवर अधिक विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “इथल्या मुलांना शिक्षणासोबतच मूल्ये, सुरक्षितता आणि योग्य काळजी मिळते. लोकांचा विश्वास वाढला, तर ही व्यवस्था अधिक सक्षम होईल,” असे ते म्हणाले.

दरम्यान, अंगणवाडी केंद्रात खेळत असलेल्या गर्ग यांच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.