ICC Team of the Tournament –  टी-२० वर्ल्ड कप 2026 च्या सर्वोत्तम संघाची घोषणा, वेगवान शतकवीराला वगळलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-२० वर्ल्ड कप 2026 स्पर्धा संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर केली आहे. या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र विशेष म्हणजे अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फिन अ‍ॅलनलाही या संघातून वगळण्यात आले आहे.

आयसीसीच्या या संघात सलामीसाठी साहिबजादा फरहान आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ईशान किशन आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम यांनाही संघात स्थान मिळाले असून मार्करमला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या आणि इंग्लंडचा विल जॅक्स यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वेस्ट इंडिजचा अनुभवी ऑलराउंडर जेसन होल्डरलाही या संघात स्थान मिळाले आहे.

गोलंदाजी विभागात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एन्गिडी, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद आणि झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजरबानी यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वेचा युवा सलामीवीर ब्रायन बेनेट यालाही या संघात स्थान मिळालेले नाही, त्याने स्पर्धेत 146 च्या सरासरीने 292 धावा केल्या होत्या. अमेरिकेचा शॅडले वॅन शॅकविक हाही या संघात समाविष्ट करण्यात आला आहे.