आयसीसीचा चेअरमन कोण होणार? योग्य उमेदवार मिळेना

385

शशांक मनोहर यांनी माघार घेतल्यानंतर आयसीसीच्या चेअरमनपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. या पदाच्या नियुक्तीसाठी आयसीसीच्या संचालक समितीची बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती, पण शशांक मनोहर यांच्या नंतर या पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आयसीसीचा पुढील चेअरमन कोण होईल? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आयसीसीच्या बैठकीत नामांकन प्रकियेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते, पण आयसीसी या जागतिक क्रिकेटमधील प्रमुख संस्थेची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर सोपवण्यात यायला हवी तसा तगडा उमेदवार अद्याप मिळालेला नाही.

इतर उमेदवारांवर नजर

पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एहसान मनी यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुख पदावर कायम राहण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना आयसीसीचे चेअरमनपद नकोय. इंग्लंडचे कोलिन ग्रेव्हस, वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष डेव्ह कॅमरून, दक्षिण आफ्रिकेचे ख्रिस नेनझॅनी यांनाही संधी आहे, पण सदस्यांचा सपोर्ट त्यांना मिळणार नसल्याची माहिती आयसीसीच्या माजी संचालकाकडून यावेळी देण्यात आली.

सौरभ गांगुलीबाबत प्रश्नचिन्ह

आयसीसीच्या चेअरमनपदासाठी हिंदुस्थानचा सौरभ गांगुली योग्य उमेदवार ठरू शकतो, पण सध्या राजेंद्र लोढा समितीच्या ‘कुलिंग ऑफ पीरियड’ या नियमामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कायम राहण्यात त्याला अडचणी येत आहेत. नव्या घटनेत बदल करावा अशी मागणी त्याने बीसीसीआयद्वारे न्यायालयाकडे केली आहे. तसेच आता मी आयसीसी चेअरमनपदासाठी उत्सुक नसल्याचेही त्याने काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे आता तो भविष्यात कोणता निर्णय घेतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दोन गटांत विभागणी

17 सदस्यांच्या मतांनंतर आयसीसीचा नवा चेअरमन निवडून येईल. यापैकी 12 मते त्याला मिळाली. त्याची चेअरमनपदाची खुर्ची पक्की होईल. नऊ मते मिळाल्यानंतरही त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली, पण दोन गटांमध्ये सदस्यांची विभागणी झालेली आहे. एका गटात हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व इतर सात सदस्यांचा समावेश आहे. दुसऱया गटात प्रभारी चेअरमन इम्रान ख्वाजा, इंद्रा नुयी, पाकिस्तान व इतर तीन असोसिएट सदस्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या