
1877 सालापासून कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. क्रिकेटमधील या प्रकाराला पारंपरिक अन् प्रतिष्ठsचे समजले जाते. क्रिकेटपटू सफेद रंगाच्या पोशाखासह कसोटी लढत खेळतात. या प्रकारात लाल रंगाचा चेंडू वापरतात. याच पार्श्वभूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात येत नाही. पण द्विपक्षीय मालिका, टी-20 लीगच्या विस्तारासाठी या मानाच्या प्रकारात बदल करण्यात येणार आहे. आयसीसीकडून याबाबत सांगण्यात आले. 2023 सालापासून कसोटी सामना पाचऐवजी चार दिवसांचा खेळवण्यात येण्याचा प्रस्ताव पुढे आला असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागील 142 वर्षांच्या कसोटीच्या नियमात थोडा बदल होणार हे निश्चित.
12 ते 18 महिन्यांत निर्णय होणार
या प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे केव्हीन रॉबर्ट्स म्हणाले, गेल्या पाच ते दहा वर्षांत झालेल्या कसोटी सामन्यांच्या निकालांवर दृष्टिक्षेप टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. चार दिवसीय कसोटी सामना होणे गरजेचे आहे. आगामी 12 ते 18 महिन्यांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गृहीत धरायला हरकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
यजमान देशाची तिजोरी भरेल
कसोटी पाचऐवजी चार दिवसांची खेळवण्यात आली, तर यजमान देशाची तिजोरी नक्कीच भरेल. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यात 2018 साली झालेल्या चार कसोटी सामन्यांची मालिका 20 दिवसांत आटोपली. ही मालिका प्रत्येकी चार दिवसांचा एक सामना अशी झाली असती तर पाच सामन्यांची मालिका पार पडली असती. चार दिवसांचा कसोटी सामना झाल्यास प्रक्षेपणकर्तेही धनाढय़ होतील.





























































