रिव्हर्स स्विंगसाठी वन डेत नवा प्रयोग, 34 व्या षटकानंतर एकच चेंडू येणार वापरता; आयसीसीचे नवे वन डे नियम 17 जून्पासून लागू

वन डे अर्थातच एकदिवसीय क्रिकेटला आणखी थरारक बनविण्यासाठी, तसेच गायब होत असलेल्या रिव्हर्स स्विंगला पुन्हा एकदा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) येत्या 2 जुलैपासून नवे नियम लागू करणार असल्याचे जाहीर केले. गेल्या एका दशकापासून वन डेत दोन्ही एण्डकडून वेगवेगळे चेंडू वापरण्याचा नियम लागू केला होता. त्या नियमात बदल करण्यात आला असून आता 34 षटकानंतर म्हणजे 35 व्या षटकापासून दोनपैकी कोणताही एकच चेंडू वापरण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. तसेच कन्कशन रिप्लेसमेंट संदर्भातील बदल आणि सीमारेषेवरील झेलासंदर्भातील नव्या नियमांचा समावेश केला जाणार आहे.

कन्कशन रिप्लेसमेंटसाठी 5 पर्याय अनिवार्य

कन्कशन रिप्लेसमेंटच्या नियमांमध्येही आयसीसीने मोठा बदल केला आहे. आता प्रत्येक संघाने सामन्यापूर्वी मॅच रेफ्रीला किमान पाच संभाव्य कन्कशन रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी द्यावी लागेल. या यादीत एक यष्टिरक्षक, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू आणि एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश असणे बंधनकारक आहे. विशेष बाब म्हणजे, जर रिप्लेस केलेला खेळाडूदेखील दुखापतीमुळे बाहेर गेला तर मॅच रेफ्री नव्याने पर्यायी खेळाडूची निवड करू शकतो.

दोन नियमांवर अजूनही चर्चा सुरू

सीमारेषेवरील झेल व डीआरएस प्रोटोकॉलसंदर्भातील नियमांमध्ये होणाऱया बदलांची माहिती अद्यापि देण्यात आलेली नाही. आयसीसीच्या निवेदनानुसार, लवकरच यावर अधिकृत माहिती दिली जाईल. कारण या नियमांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

अंमलबजावणीची वेळ

कसोटीतील नवीन नियम जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 च्या हंगामापासून लागू होतील. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 17 जूनपासून गॉल येथे सुरू होणाऱया पहिल्या टेस्टपासून त्याची अंमलबजावणी होईल, मात्र याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यान 11 जूनपासून लॉर्ड्स मैदानावर होणारा अंतिम सामना जुन्या नियमांनुसारच खेळवण्यात येईल.

वन डेमध्ये 34 षटकांनंतर एकच चेंडू

ऑक्टोबर 2011 पासून वन डे क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याचा नियम लागू करण्यात आला होता. यामध्ये दोन वेगवेगळय़ा बाजूंनी दोन चेंडू वापरले जातात. मात्र आयसीसीच्या नव्या नियमानुसार आता 1 ते 34 षटकांपर्यंत दोन चेंडू वापरले जातील, मात्र 35 व्या षटकापासून एकच चेंडू सामन्याच्या अखेरपर्यंत वापरण्यात येईल. म्हणजेच, 34 षटकांनंतर क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला त्या दोन चेंडूंमध्ये एका चेंडूची निवड करावी लागेल. याचबरोबर जोपर्यंत चेंडू बदलण्याची गरज वाटणार नाही तोपर्यंत तोच चेंडू उर्वरित षटकांमध्ये दोन्ही बाजूने वापरला जाईल. मात्र सामना 25 किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा असेल तर गोलंदाजी एकाच चेंडूने केली जाईल. हा बदल गोलंदाजीत रिव्हर्स स्विंग पुन्हा आणण्यासाठी तसेच गोलंदाजी आणि फलंदाजीत संतुलन साधण्यासाठी आयसीसीने हा नियम बदलला आहे. 2011 पासून विकेटच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळे चेंडू वापरण्याचा नियम केला होता. त्या नियमामुळे चेंडू जुनाही होत नव्हता आणि त्यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगही टाकता येत नव्हते, मात्र या नियमानंतर किमान शेवटच्या काही षटकांत गोलंदाजांना आपल्या रिव्हर्स स्विंगची करामात दाखवता येईल.