
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज रोहित शर्माने ICC Men’s ODI Batting Ranking मध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा त्याच्या आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याच्या नावावर सध्या 781 रेटिंग गुणांसह असून त्याने शुभमन गिलला मागे टाकलं आहे. तसेच पहिल्या क्रमांकावर विराजमान होणारा तो सर्वात जास्त वयाचा (38) खेळाडू ठरला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने दमदार फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यात त्याने 73 धावांची आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 121 धावांची वादळी खेळी. रोहित आणि विराटने हा सामना टीम इंडियाला जिंकून दिला. रोहितच्या याच दमदार कामगिरीमुळे त्यांनी वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. त्याच्या खात्यात 781 पॉईंट्स जमा झाले आहेत.
आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांक पटकावणारा रोहित शर्मा पाचवा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता यामध्ये रोहित शर्माच्या नावाचा सुद्धा समावेश झाला आहे.




























































