WC 2023 – श्रीलंकेला हरना मना है!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पराभवाची हॅट्ट्रिक करणाऱया श्रीलंकेसाठी नेदरलॅण्ड्सविरुद्ध हरना मना है! स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी श्रीलंकेला डच संघाविरुद्ध पहिला विजय नोंदवावाच लागेल. दुसरीकडे नेदरलॅण्ड्सलाही विजयाची नितांत गरज असून ते जिंकले तर त्यांचे आव्हान कायम राहील आणि पराभूत झाले तर त्यांचे आव्हान संपल्यातच जमा होईल. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ आपली हार टाळण्यात यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 उद्या अस्तित्वाच्या लढाईसाठी श्रीलंका आणि नेदरलॅण्ड्स मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या तीन सामन्यांत पराभव झाल्यामुळे लंकेचा प्रवास खडतर झाला असून, प्रमुख खेळाडूंच्या दुखापती हे लंकेपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. उद्याच्या सामन्यात कुसल मेंडिस, समरविक्रमा, दिलशान मदुशंका यांच्यावर लंकेची मदार असणार आहे.

गेल्या सामन्यात नेदरलॅण्ड्सने आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषकातील विजयाचे खाते उघडलेले आहे. तीन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवल्याने अद्यापि त्यांचे आव्हान टिकून आहे. मात्र, उद्याच्या सामन्यात विजय अनिवार्य असल्याने त्यांचे खेळाडू जिवाचे रान करतील यात तीळमात्र शंका नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केलेला नेदरलॅण्ड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्डस्, कॉलिन एकरमन, बास डी लीडे यांच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर गोलंदाजीत व्हॅन डर मर्व्ह, पॉल व्हॅन मीकरेन, लोगान व्हॅन बीक यांची जादू चालेल का हे पाहण्याजोगे होणार आहे.