बीसीसीआयच्या सहकार्याशिवाय आयसीसीचे अस्तित्व अधुरे – अनुराग ठाकूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) सहकार्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( आयसीसी ) अस्तित्वच अधुरे आणि अर्थहीन आहे. आयसीसीच्या महसुलातील 75 टक्के वाटा हिंदुस्थानी बोर्डच आपल्या उत्पन्नातून देते. त्यामुळे बीसीसीआयला ठेंगा दाखवत आपल्याला कारभार करता येईल या भ्रमात आयसीसीने राहू नये, असे खडे बोल बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जगातील शिखर क्रिकेट संघटनेला सुनावले आहेत.

हमीरपूरमधील सांसद महाकुंभ मेळ्यातील पारितोषिक वितरण सोहोळ्यासाठी ठाकूर आपल्या मतदारसंघात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आयसीसीच्या हिंदुस्थानची अडवणूक कराल तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, बीसीसीआयच तुम्हाला सर्वाधिक महसूल देतेय असे बजावले. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली आयसीसीकडून आपला न्याय्य वाटा मिळवतील, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.

खेळाने व्यक्तीत्वाचा विकास होतो.शिवाय चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यात क्रीडा क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे ,अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी युवकांनी मोठ्या संख्येने खेळाकडे वळावे आणि देशाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन पारितोषिक वितरण सोहोळ्यात केले. हमीरपूरच्या या खेळ महाकुंभात 1400 संघांचे 42,700 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. बीसीसीआयच्या कारभाराशी आपला थेट संबंध नसला तरी या संघटनेच्या माध्यमातूनच मी मोठा झालोय त्यामुळे अडीअडचणीच्या वेळेस संघटनेला सल्ला देणे मी माझे कर्तव्यच मानतो असे ठाकूर यांनी सांगितले.