
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही आपल्या बॅटीला धार लावूनच मैदानात उतरले होते. दोघांनीही गोलंदाजांना चोपून काढात धावांची लयलूट केली. विराटने एक अर्ध शतकं आणि दोन शतके ठोकली तर रोहित शर्मानेही दोन अर्धशतके ठोकली. दोघांच्याही विस्फोट खेळामुळे त्यांना ICC क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे.
ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत वनडेमध्ये रोहित शर्माने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडेमध्ये हिंदुस्थानसह आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 302 धावा करत मालिकावीर होण्याचा बहुमान पटकावला होता. त्यामुळे त्याने 773 गुण मिळवले आणि दोन स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर रोहित शर्मा 781 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डॅरल मिचेल, चौथ्या क्रमांकावर अफगानिस्तानचा इब्राहिम जादरान आणि पाचव्या क्रमांकावर शुभमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे.



























































