
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता बाद फेरीचा थरार सुरू झालाय. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये आज पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकमेव अजेय संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान किवी संघापुढे असेल. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडला एकदाही दक्षिण आफ्रिकेला हरविता आलेले नाही. त्यामुळे इतिहास बदलण्यासाठी न्यूझीलंडला मैदानावर सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे. शिवाय दोन्ही संघ अद्याप आपल्या पहिल्या टी-20 जगज्जेतेपदाच्या प्रतीक्षेत असल्याने उभय संघ उद्या ईडन गार्डन्सवर जिवाचे रान करताना दिसतील.
स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी करत सुपर-8 पर्यंत एकही सामना गमावलेला नाही. गट टप्प्यातील चार आणि सुपर-8 फेरीतील तीनही सामने जिंकून हा संघ सुस्साट सुटलाय. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या यजमान टीम इंडियालाही त्यांनी सुपर-8 लढतीत पराभवाचा तडाखा दिलेला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमधील आपली परंपरा कायम राखत उपांत्य फेरी गाठली आहे, मात्र इतिहास त्यांच्या विरोधात आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्यावर 4-0 असा निर्विवाद वरचष्मा राहिलेला आहे. मात्र स्पर्धेत सातपैकी केवळ एक सामना गमावलेल्या न्यूझीलंडला आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी इतिहास बदलावा लागणार आहे.
T20 WC 2026 – वानखेडेवर घुमणार ‘मुंबई इंडियन्स’चा गजर; इंग्लंडला नमवण्यासाठी चारचौघे सज्ज
खोलवर फलंदाजी हे बलस्थान
दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या दोन्ही संघांची खोलवर फलंदाजी ही बलस्थाने आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे कर्णधार एडन मार्करमसह क्विंटॉन डिकॉक, डेव्हिड मिलर असे मॅचविनर फलंदाज आहेत. न्यूझीलंडकडे टीम सेफर्ट, फिन एलन, रचिन रवींद्र, कर्णधार मिचेल सॅण्टनर असे एकाचढ एक फलंदाज आहेत. त्यामुळे उभय संघांच्या गोलंदाजीचा आज खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.
गोलंदाजी निर्णायक ठरणार
दक्षिण आफ्रिकेकडे लुंगी एनगिडी, कॅगिसो रबाडा, मार्को जॅन्सेन, केशव महाराज अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. न्यूझीलंडकडेही मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी या वेगवान त्रिकुटासह मिचेल सॅण्टनर, जेम्स निशम व इश सोधी ही फिरकीची फौज असेल. इश सोधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्यासाठी अवघ्या तीन विकेट दूर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी न्यूझीलंडला मिळाली आहे. मात्र संधीचे सोने करण्यासाठी न्यूझीलंडला निर्णायक गोलंदाजी करावी लागणार आहे.
उभय संभाव्य संघ
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
न्यूझीलंडचा संघ – फिन एलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सॅण्टनर, जेम्स निशम, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, इश सोधी.




























































