
टीम सायफर्ट आणि फिन अॅलन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) तब्बल 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. दोघांनी मिळून 175 धावांची अभेद्य भागीदारी रचत टी-20 वर्ल्डकपमधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी नोंदवत आपल्या संघाला विक्रमी विजय मिळवून दिला. टीम सायफर्ट या सामन्याचा मानकरी ठरला.
यूएईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 173 धावा केल्या. मोहम्मद वसीम (66) आणि अलिशान शराफू (55) यांनी शतकी भागीदारी करत संघाला भक्कम धावसंख्या उभी करून दिली. मात्र न्यूझीलंडने हे आव्हान एकही फलंदाज न गमवता तब्बल 27 चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह न्यूझीलंडने ‘ड’ गटातील सलग दुसरा सामना जिंकत ‘सुपर एट’ फेरीकडे दमदार वाटचाल केली आहे.
सायफर्ट-अॅलनचा धडाका
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम सायफर्ट (89) व फिन अॅलन (84) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पण नियंत्रित फलंदाजी केली. पॉवरप्लेमध्येच दोघांनी जवळपास अर्धे लक्ष्य गाठले. 78 धावांच्या सुरुवातीच्या भागीदारीत नऊ चौकार आणि चार षटकारांचा पाऊस पडला. अॅलनने फिरकीविरुद्ध संयम दाखवत वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला, तर सायफर्टने अवघ्या 23 चेंडूंत अर्धशतक झळकावत सामन्यावर शिक्कामोर्तब केले.
किवी गोलंदाजांची कसोटी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मात्र अपेक्षेइतकी प्रभावी कामगिरी करता आली नाही. विशेषतः 18व्या षटकात ग्लेन फिलिप्सने दिलेल्या 27 धावांनी यूएईला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत झाली. हिंदुस्थानविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेनंतर न्यूझीलंडसाठी गोलंदाजी अजूनही चिंतेचा विषय असल्याचे या सामन्यात पुन्हा दिसून आले.

























































