
टीम इंडियाने रविवार (8 मार्च) क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. महेंद्र सिंग धोनी (2007) आणि रोहित शर्मा (2024) यांच्यानंतर विश्वचषक उंचावणारा सूर्यकुमार यादव हा तिसरा हिंदुस्थानी कर्णधार ठरला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या ऐतिहासिक विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादव कमालीचा उत्साही दिसला. मात्र, या यशाने हुरळून न जाता त्याने हिदुस्थानी क्रिकेटच्या भविष्यातील एका मोठ्या ध्येयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. सूर्या म्हणाला की, “हा विजय आमच्यासाठी खूप खास आहे. पण आता आमचे सर्वात मोठे लक्ष्य ऑलिम्पिक्स आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे आणि त्याच वर्षी होणारा टी-20 विश्वचषक पुन्हा खिशात घालणे, हेच आमचे आताचे स्वप्न आहे.” असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेटचा समावेश पहिल्यांदा 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेटचा स्थान देण्यात आले नाही. आता तब्बल 128 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. हिंदुस्थानी संघाने 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकल्यापासून जो आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे, तोच ‘अॅग्रेसिव्ह मोड’ ऑलिम्पिकमध्येही पाहायला मिळणार असल्याचे संकेत सूर्याने दिले आहेत.
























































