आता बदली खेळाडू फलंदाजी-गोलंदाजीही करू शकेल! कन्कशन बदली खेळाडू नियमाची आयसीसीत चर्चा

77

सामना प्रतिनिधी । लंडन

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डोक्यावर अथवा शरीरावर चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ऍलेक्स कॅरी आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला गंभीर जखमी झाले होते. कॅरीने बँडेज बांधून फलंदाजी केली, पण आमला मात्र मैदानात पुन्हा फलंदाजीला उतरू शकला नव्हता. त्यामुळे आता गंभीर जखमी खेळाडूंऐवजी कन्कशन सबस्टिटय़ूट प्रकाराचा 1-1 बदली खेळाडू उभय संघानी ठेवावा. आणीबाणीच्या वेळेस हा खेळाडू जखमी खेळाडूंऐवजी फलंदाजी, गोलंदाजी अथवा यष्टिरक्षणही करू शकेल अशा बदलांचा विचार आयसीसीच्या सुरू असलेल्या वार्षिक बैठकीत केला जाणार आहे. क्रिकेटपटूंच्या जीविताची काळजी घेऊन क्रिकेट अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा नवा बदली खेळाडूचा नियम आयसीसी मंजूर करू शकते. तसे झाल्यास यंदाच्या ऍशेस मालिकेपासूनच या नव्या बदलाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आयसीसीच्या नियमानुसार सध्या बदली अथवा राखीव क्रिकेटपटूला मैदानात फक्त क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते. पण एखादा क्रिकेटपटू डोक्यावर अथवा शरीरावर चेंडू लागून गंभीर जखमी झाल्यास आणि तो पुढे खेळणे शक्य नसल्यास त्याच्याऐवजी कन्कशन बदली खेळाडू मैदानात जायबंदी खेळाडूची जागा घेऊ शकेल. वेगवान गोलंदाज जायबंदी झाल्यास त्याची जागा बदली गोलंदाज घेईल आणि फलंदाज जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली (कन्कशन) खेळाडू मैदानात येईल. या बदली खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजी अथवा यष्टीरक्षण करता येणार आहे. मात्र अशा खेळाडूच्या समावेशासाठी डॉक्टरांनी जखमी क्रिकेटपटूंच्या गंभीर दुखापतीने प्रमाणपत्र संघांना द्यायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या