IND W vs SA W शेफाली वर्माच्या नशिबाची रात्र

ती संघात नव्हती. राखीव यादीत नव्हती. चर्चेत नव्हती; पण अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द फायनल’ ठरली. आता हे जर नशीब नसेल तर ‘नशीब’ शब्दाचा अर्थ बदलावा लागेल. नवी मुंबईतल्या कालच्या रविवारी रात्री डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये फक्त दिवेच उजळले नव्हते, नियतीनेही दिवे लावले होते. ती रात्र होती शेफाली वर्माच्या नशिबाची.

वर्ल्ड कपच्या संघ निवडीतून वगळल्यावर लोक म्हणाले, आता शेफाली संपली! पण शेफालीच्या स्वभावात एक गोष्ट आहे, ती ‘संपली’ की ‘सुरू झाली’ हे ओळखणं अवघड असतं. ती परत स्थानिक क्रिकेटकडे गेली. तिने स्वतःवर आलेली धूळ झटकली आणि स्वतःलाच विचारलं, बॉल माझ्या बॅटवर येतोय, पण निवड समितीच्या डोक्यात का येत नाही? मग नियतीने तिच्यासाठी लास्ट मिनिट अपडेट केलं. प्रतीका रावल जखमी आणि शेफाली संघात! एक प्रकारे देवानेच सब्स्टिटय़ूट बटण दाबलं. हे खरं आहे. यालाच दैव म्हणतात.

अंतिम सामन्यात जेव्हा ती मैदानावर आली तेव्हा तिच्या नजरेतला आत्मविश्वास भारावून सोडणारा होता. तेव्हा कॉमेंटेटरच  म्हणाले, ‘ही मुलगी फॉर्ममध्ये नाहीय, पण फॉर्मला घेऊन आलीय. ती सुरुवातीला थोडी शांत दिसली, पण शांत शेफाली म्हणजे शाकाहारी वाघ. जास्त वेळ ती तशी राहणार नाही याची कल्पना होती. 20 चेंडू चौकाराविना आणि मग अचानक क्लर्कचा चेंडू हवेत गायब.

आणि मग आला तो क्षण. हरमनप्रीतनं चेंडू शेफालीच्या हातात दिला आणि म्हणाली, चल फेक. शेफालीच्या हातात चेंडू पाहून जगभरातील कॉमेंटेटर चकित. ती गोलंदाजी करते? उत्तर होतं, हो, करते आणि करते तेव्हा फलंदाजांचा आत्मविश्वास ‘एअरपॉड’सारखा हरवतो. पहिलाच चेंडू  95 किमी ताशी वेग. दुसरा  84 किमीचा ऑफब्रेक. दक्षिण आफ्रिकेच्या सुन लूसने फटका मारला आणि चेंडू थेट शेफालीच्या हातात आला. ती आधीच हसत होती, जणू तिला हे आधीच माहीत होतं. पुढच्या षटकात मेरिझान पॅपलाही तिनं फिरकीत फिरवलं.

हा वर्ल्ड कप तिच्यासाठी नव्हता, पण  तो तिच्याशिवाय अपूर्ण राहिला असता. तिच्या बॅटने धावा केल्या, तिच्या फिरकीने विकेट मिळवले आणि तिच्या हसण्याने इतिहास घडवला. ‘प्लेअर ऑफ द फायनल’ पुरस्कार घेताना ती म्हणाली, नाही, हे माझं नशीब आहे. ती फक्त हसली. कारण कधी कधी नशीबही तिच्यासमोर नतमस्तक होतं.

आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय. प्रतीका परतल्यावर शेफाली कुठं बसेल? सलामीला? मधल्या फळीत? की सर्वसमावेशक भूमिकेत? पण एक गोष्ट ठरलेली आहे, शेफाली ‘बेंचवर’ बसणारी नाही, ती ‘इतिहासावर’ बसलेली आहे.

त्या रात्री शेफाली खेळली नाही. नशिबानं बॅट आणि बॉल तिच्या हातात दिला. ती ‘बदल’ म्हणून संघात आली, पण ‘बदला’ घेऊन गेली आणि वर्ल्ड कपच्या इतिहासात लिहिलं गेलं, काही जणींची निवड निवड समिती करते, पण दंतकथा? त्यांची निवड नियती करते.