
डोक्यात दगड घालून युवकाचा खून झाल्याची घटना इचलकरंजी बसस्थानकाजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.
उदय मधुकर गवळी (वय 25, रा. रेणुकानगर झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे. आदित्य दीपक रसाळ (वय 21), अजय उर्फ नवनाथ बापू काशीद (वय 22, दोघे रा. नमजगा माळ), आदम उर्फ संब्या महमंद मुजावर (वय 19, रा. नेहरूनगर झोपडपट्टी, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उदय आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान गवळी हा दारू दुकानातून दारू पिऊन बाहेर पडला. त्यांना बाहेर थांबवून अजय काशीद याने ‘तुझ्या आजीला का मारले’, असा प्रश्न केला. यावर ‘मी माझ्या आजीला मारेन, काहीही करेन, तू विचारणारा कोण?’ असा प्रतिप्रश्न उदयने केला. यानंतर तिघांनी उदयला बोलत बसस्थानकाजवळच्या मोकळ्या जागेत घेऊन जात डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
आरोपी काशीद आणि गवळी याच्यात दीड वर्षांपूर्वी भांडण झाले होते, अशी माहितीही पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी आदींनी घटनास्थळी भेट दिली.























































