
कोरोना काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला नगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्यात हा विभाग रुग्णसेवेत दाखल होत आहे. दरम्यान, 13 महिने उलटूनही जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागातील या आगीचे कारण समजू शकलेले नाही.
नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात मागील वर्षी 7 नोव्हेंबरला आग लागली होती. भाऊबिजेच्या दिवशी ही भीषण घटना घडली होती. या घटनेत सुरुवातीला 11 रुग्णांचा आगीने होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण 14 जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी त्याच वेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील सहा जणांना निलंबित केले होते. विभागीय आयुक्तांमार्फत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. तत्कालीन विभागीय आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता.
दरम्यान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने याची चौकशी पूर्ण केली. मात्र, ही आग कशामुळे लागली, हे आजतागायत जाहीर केलेले नाही. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागील महिन्यामध्ये या आगीचे कारण आपण स्पष्ट करू, असे सांगितले होते. मात्र, त्यांनाही याचा विसर पडला आहे. याप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांचे जामीनही झाले आहेत. दरम्यानच्या काळात निलंबित अधिकारी व कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे.
18 बेड, सेंट्रल मॉनिटरिंग ऑक्सिजन सिस्टिम, 10 व्हेंटिलेटर
अतिदक्षता विभागाच्या नूतनीकरणाच्या कामाला जूनमध्ये सुरुवात करण्यात आली होती. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात हा विभाग रुग्णांच्या सेवेत सुरू होणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात 18 बेड असून, सेंट्रल मॉनिटरिंग ऑक्सिजन सिस्टिम तसेच दहा व्हेंटिलेटर अशी सुविधा करण्यात आलेली आहे.

























































