
तामीळनाडूमध्ये इडली अम्मा गोरगरीबांना अवघ्या एक रुपयात इडली विकतात. आपल्या मोडक्यातोडक्या घरात, चुलीवर इडली बनवण्याचे काम त्या गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. अगदी लॉकडाऊनमध्ये त्यांनी या कामात खंड पडू दिला नाही. त्यांच्या या सामाजिक कार्याने सर्वांनाच प्रभावित केले. इडली अम्मा आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांना आता इडली बनवण्यासाठी हक्काचे घर मिळणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
इडली अम्मांचा व्हिडीओ 2019 साली पहिल्यांदा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी भारत गॅस, कोईम्बतूरने अम्माला एलपीजी कनेक्शन दिले. आता आनंद महिंद्रा यांनी अम्माला व्यवसाय चालवण्यासाठी हात दिला आहे. महिंद्रा उद्योग समूहाने अम्माच्या नावावर जमीन घेतली आहे. थोंडमुथुरच्या कार्यालयात जागेची नोंदणी नुकतीच झाली. लवकरच त्या जागेवर घर बांधण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती महिंद्रा यांनी आज दिली.
वडिवेलमपालम येथे कमलाथल अम्मा दररोज एक हजार इडलीची विक्री करतात. इडली बनवण्यासाठी त्या सर्व कामे एकटय़ानेच करतात. इडलीचे पीठ दळण्यासाठी त्यांना चार तास लागतात. हे काम त्या आदल्या दिवशी संध्याकाळी करतात. त्यानंतर पहाटेपासून इडली बनवण्याच्या कामाला सुरुवात करतात. 10 वर्षांपूर्वी त्या 50 पैशांना इडली विकायच्या, मात्र हे नाणे चलनातून बाद झाल्यावर त्या आता केवळ एक रुपयात ग्राहकांना इडली खाऊ घालतात.























































