आयडॉलच्या प्रवेशास आजपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला उद्या 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. तसेच एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये हे प्रवेश घेता येतील.

वर्ष 2020 मध्ये 900 विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये जानेवारी सत्रात प्रवेश घेतला होता. तसेच 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या जुलै सत्रामध्ये 59 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जे विद्यार्थी बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रात प्रवेश घेता आला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची ही एक संधी आहे.

सेमिस्टर पद्धतीस सुरुवात

जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमबरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए व एमका@ममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात येत आहे. एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयांत प्रवेश घेता येईल. तर एमकॉममध्येही अकाऊंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाइन असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या वेबसाईटवर जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.