रोजगार न आणल्यास ‘सायमन गो बॅक’प्रमाणे ‘सामंत गो बॅक’ म्हणावे लागेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय सामंत यांच्याकडे उद्योगखाते आहे. त्यामुळे त्यांनी आता रत्नागिरीत पंचतारांकित एमआयडीसी आणावी आणि येथील तरुणांना रोजगार मिळवून द्यावा. जर उद्योगखाते असूनही उदय सामंत तरुणांना रोजगार मिळवून देऊ शकले नाहीत तर ज्याप्रमाणे इंग्रजांच्या जुलूमी सत्तेला कंटाळून ‘सायमन गो बॅक’चा नारा दिला होता, त्याप्रमाणे ‘सामंत गो बॅक’चा नारा द्यावा लागेल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलींद कीर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

मिलींद कीर पुढे म्हणाले की, रत्नागिरीमधील निवळी येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजूर झाली होती. त्या मंजूरीमध्ये उदय सामंतांचे काहीही योगदान नव्हते. कारण ते आमदार होण्यापूर्वीच ती एमआयडीसी मंजूर झाली होती. मात्र त्यांच्या विरोधामुळे कार्यकुशलतेमुळे ती एमआयडीसी रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथे नेली. त्यामुळे 80 ते 90 हजार जणांचा रोजगार बुडाला. कोकणामध्ये प्रदूषणविरहित प्रकल्प यावेत अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे पंचतारांकित एमआयडीसी आल्यास कोणीही विरोध करणार नाही. उदय सामंत यांच्याकडे उद्योगखाते आले आहे. त्यामुळे त्यांना एक चांगली संधी आहे. रत्नागिरीची गेलेली पंचतारांकित एमआयडीसी ते नव्याने पुन्हा आणू शकतात. रत्नागिरीमध्ये पंचतारांकित एमआयडीसी आल्यास येथील स्थानिकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर व्यापार आणि बाजारपेठेतील मंदी दूर होईल. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये पंचतारांकित एमआयडीसी आणावी अशी मागणी मिलींद कीर यांनी केली.

त्यांनी उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात आपण गेली 18 वर्षे सत्तेत आमदार आणि मंत्री म्हणून काम करत आहात. परंतू रत्नागिरी तालुक्यातील जनतेला नोकरी व्यवसायासाठी कोणतीही संधी उपलब्ध करुन दिली नाहीत अशी खंतही मिलींद कीर यांनी व्यक्त केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले, ओमकार शेट्ये, वैभव वाडेकर उपस्थित होते.