मी नसतो तर जगात 6 मोठे युद्ध झाले असते, ट्रम्प यांनी पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविरामाचे श्रेय घेतले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचे श्रेय घेतले आहे. स्कॉटलंडमधील ट्रम्प टर्नबेरी रिसॉर्ट येथे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीपूर्वी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, “मी नसतो तर सध्या जगात हिंदुस्थान-पाकिस्तानसह सहा मोठी युद्धे सुरू असती.” त्यांनी व्यापाराचा दबाव वापरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचे म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, मे 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेल्यानंतर हिंदुस्थन आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. या परिस्थितीत त्यांनी व्यापार वार्ता थांबवण्याची धमकी देऊन दोन्ही देशांमध्ये 10 मे रोजी युद्धविराम घडवून आणला.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केवळ हिंदुस्थान-पाकिस्तानच नाही तर, रशिया-युक्रेन, इस्रायल-गाझा आणि इतर आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्येही त्यांनी युद्ध थांबवल्याचा दावा केला. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनीही ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करताना हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविराम आणि इतर जागतिक संघर्षांमध्ये त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला.