… तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दोन वर्षांपूर्वी हिंदुस्थानी जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमधील तू-तू मे-मे सुरु असताच सर्जिक स्ट्राईकचे निरीक्षण करणारे माजी लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय हा सर्वस्वी राजकीय नेतृत्वाने घेतल्याचे जनरल डी.एस. हुडा यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाशी लष्कर पूर्णपणे सहमत होते, कारण आम्हाला त्यावेळी काही तरी विशेष करायचे होते. भविष्यामध्ये पाकिस्तान सुधारला नाही तर त्यांना धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकते असे जनरल हुडा म्हणाले.

सत्ताधारी-काँग्रेस आमने-सामने
दोन दिवसांपूर्वी सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला होता. काँग्रेसने व्हिडीओ प्रसिद्ध करण्याच्या वेळेवर आक्षेप घेतला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन सत्ताधाऱ्यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले असून काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने पाकिस्तानमधील दहशतवादी आनंदी झाले असतील अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.