उन्हाळ्यात वाहतूक पोलिसांना थंडगार हवा देण्यासाठी आयआयएम वडोदराच्या विद्यार्थ्यांनी ‘एसी हेल्मेट’ बनवले आहे. आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे अनोखे आणि अतिशय उपयुक्त हेल्मेट वडोदरा पोलिसांनी कडक उन्हात लांब शिफ्टमध्ये काम करणाऱया 450 पोलिसांच्या वापरासाठी दिले आहे. नवीन वातानुकूलित हेल्मेट घातल्यानंतर डोके थंड ठेवण्याचे काम करते. सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यात एक ट्रफिक पोलीस रस्त्यावर उभा असल्याचे दाखवले आहे. पोलीस कर्मचाऱयाच्या हातात एक बोर्ड आहे, ज्यामध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी लिहिले आहे, परंतु येथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचे हेल्मेट. हेल्मेटच्या पुढील बाजूस एक मशीन बसवले आहे. या हेल्मेटमध्ये बाहेरून हवा खेचण्यासाठी मशीनमध्ये एक वेंट आहे, ज्याचा वापर बाहेरून गरम हवा आत घेण्यासाठी केला जाऊ शकतो. ही गरम हवा थंड हवेत रूपांतर करेल आणि हेल्मेटच्या आत पाठवेल. हे मशीन एका बॅटरीशी जोडलेले आहे, जी पोलीस कर्मचाऱयाच्या कमरेला असलेल्या बेल्टवर असेल.