आयआयटी मुंबई करणार महापुराचे भाकीत, शास्त्रज्ञांनी बनवली ‘फ्लड फोरकास्टिंग सिस्टम’

2005 मध्ये मुंबईला महापुराचा फटका बसला होता. 2015 मध्ये चेन्नईतील महापुराने सुमारे 500 बळी घेतले होते आणि 50 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. पावसाप्रमाणेच आता या महापुराचाही अंदाज घेता येणार आहे. पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी त्यासाठी ‘फ्लड फोरकास्टिंग सिस्टम’ विकसित केली आहे. ही देशातील अशा प्रकारची पहिलीच यंत्रणा आहे ज्याआधारे महापुराचे भाकीत वर्तवणे शक्य होत आहे. सध्या ही यंत्रणा चेन्नईत असून लवकरच मुंबईतही स्थापित केली जाणार आहे.

देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी शहरांमधील महापुराचा अंदाज घेणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी विविध सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमधील तज्ञांची बैठक त्यांनी बोलवली होती त्यात आयआयटी मुंबईच्या सिव्हिल इंजिनीयरिंग विभागाचे प्राध्यापक सुबिमल घोष यांचाही समावेश होता. त्यानंतर देशातील विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या टीमने अवघ्या दीड वर्षात ‘फ्लड फोरकास्टिंग सिस्टम’ बनवली.

आठ संस्थांमधील 30 शास्त्रज्ञांची टीम तैनात
प्रा. घोष यांच्या नेतृत्वाखाली विविध आठ संस्थांमधील 30 शास्त्रज्ञांची टीम या यंत्रणेवर देखरेख ठेवते. पावसामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी किती वाढली आहे, नद्यांच्या प्रवाहाचा वेग किती आहे त्याची माहिती सेन्सर्सद्वारे या यंत्रणेला मिळते आणि त्यावरून महापुराचा अंदाज वर्तवणारा नकाशा मिळतो. ही यंत्रणा स्वयंचलित असल्याचे प्रा. घोष यांनी सांगितले.

6 ते 72 तासांमधील पुराचा अंदाज घेता येतो
या यंत्रणेचा पहिल्यांदा वापर झाला तो चेन्नईमध्ये. तेथील पाऊस, हवामानाची स्थिती, समुद्राची भरती, प्रमुख नद्या आणि जलाशयांमधील पाण्याची स्थिती, पावसाचा पूर्वीचा डाटा, जमिनीचा वापर, पाण्याचा निचरा करण्याचे व्यवस्थापन अशा माहितीच्या आधारावर पुढील 6 ते 72 तासांमधील संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेतला गेला. प्रत्येक सहा तासांनी तो अपडेट केला गेला. या यंत्रणेने दिलेला अंदाज 80 टक्के खरा ठरल्याचे प्रा. घोष सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या