गुड मॉर्निंग गाईज!! पवई आयआयटीच्या हॉस्टेलमध्ये पुन्हा गोमातेची एंट्री

293

पवईच्या आयआयटी मुंबईत मोकाट जनावरांचा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहापर्यंत अद्यापही बिनधास्त वावर सुरू आहे. सोमवारी सकाळीच एका गोमातेने वसतिगृहातील एका खोलीचा दरवाजा ढकलत थेट आतमध्ये प्रवेश केला. हे आगळेवेगळे गुडमॉर्निंग पाहून आतमधील विद्यार्थ्यांची मात्र भंबेरी उडाली. गाईपासून दूर जाण्यासाठी त्यांनी थेट टॉयलेटमध्ये धूम ठोकली.

रस्त्यावरून इमारतींमध्ये, तिथून लॉबीत, नंतर वर्गात आणि आता थेट विद्यार्थ्यांच्या खोलीत गाई-बैलांची एंट्री होऊ लागल्याने आयआयटी मुंबईचे व्यवस्थापन चिंतेत पडले आहे. विद्यार्थी सध्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे आयआयटीचे व्यवस्थापन मोकाट गाई-बैलांना विद्यार्थ्यांपासून दूर कसे ठेवायचे यावर उपाय शोधत आहे. त्याचा मोका साधत एका गाईने थेट वसतिगृहातील खोलीमध्ये प्रवेश केला. इंटरनेटवर सर्फिंग करत बसलेल्या विद्यार्थ्यांची अचानक आलेल्या गाईला पाहून पळापळ झाली. तिच्यापासून बचावासाठी ते टेबलवर चढले आणि नंतर टॉयलेटमध्ये घुसले.

दोन दिवसांपूर्वी पुस्तक खाल्ले
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गाईला पाहून विद्यार्थ्यांची झालेली पळापळ त्यात दिसत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्थापनाला अजून किती वेळ लागणार आहे, असा सवाल विद्यार्थी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका गाईने पुस्तकाची पाने चावून खाल्ली होती.

आपली प्रतिक्रिया द्या