
‘अनाथ होईल वेदना जगी माझ्यानंतर’ म्हणत वेदनेलाही कवेत घेणारे गझलकार इलाही जमादार यांनी रविवारी तमाम चाहत्यांवर वेदनेचा आघात केला. इलाहींनी वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. जखमांना सुगंधी करणारे इलाही कधीही भरून न येणारी जखम देऊन गेले. वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकात भेटलेली माणसे गेली कुठे, असे अंतर्मुख करणारे सवाल मागे सोडून गेले. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणाऱया गझलनवाजाच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. काही वर्षांपूर्वी तोल जाऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यांच्यावर उद्या सांगलीतील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी सांगलीतील दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. त्यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. लेखनावरची पकड, थेट काळजाला भिडणारे शब्द यामुळे त्यांच्या गझला फार कमी वेळात जनसामान्यांपर्यंत पोचल्या आणि गझल क्षेत्रात त्यांचे नाव झाले. त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेट भट यांच्यानंतर मराठी गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते ‘गझल क्लिनिक’ ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे.
इलाहींनी गझलांतून दुःख आणि वेदनांना शब्दबद्ध केले. त्यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यामध्ये भाग घेतला. महाराष्ट्रातील अनेक शहरांत तसेच महाराष्ट्राबाहेर त्यांचे स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गझलांसंदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम व्हायचे. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत. एक ओळ मराठीमधील आणि एक ओळ उर्दूमधील असा वेगळाच प्रयोग तेव्हा समोर आला.
तळहात आज दोन्ही उसवून पाहिले
इलाही जमादार यांनी संपूर्ण आयुष्य गझलेला वाहिले. मराठी गझलेच्या प्रसारात त्यांचा मोठा वाटा आहे. गझलगायक भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक गझला गायल्या आणि त्या सर्व लोकप्रिय झाल्या.
नाव गाव माझे बदलून
पाहिले मी
अन् मुखवटे हजारो चढवून
पाहिले मी…
मी काय काय केले,
सांगू किती कुणाला
तळहात आज दोन्ही उसवून
पाहिले मी…
मराठी गझलेचा आरसा हरवला! – भीमराव पांचाळे
इलाही जमादार आणि माझी पहिली भेट 1983 साली झाली. 38 वर्षांची आमची मैत्री. अंदाज वाटे आरशाचा खरा असावा… ही त्यांची पहिली गझल मी गायली. त्यानंतर त्यांच्या कित्येक गझल मी सादर केल्या. तंत्रशुद्ध आशयघन गझल हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांच्या गझल समजायला कुणाला कष्ट पडायचे नाहीत. थेट कानावाटे मनात उतरायच्या. किंबहुना जखमा सुगंधी असू शकतात हा परिचय मराठी माणसाला झाला तो त्यांच्यामुळेच. आज मात्र इलाही आपल्याला कधीही न भरून येणारी जखम देऊन निघून गेलेत. त्यांच्या जाण्याने मराठी गझलेचा ‘आरसा’ हरपला.
माझ्या मैफलीची सुरुवात इलाहींच्या गझलनेच व्हायची. अगदी अलीकडे म्हणजे डिसेंबर महिन्यात मी महफिल–ए-इलाही’ हा इलाहींच्या रचनांवर आधारित कार्यक्रम सादर केला. घर वाळूचे बांधायचे, काळजाला सारखा जाळीत गेलो, भावनांची वादळे उठली अचानक, आकाशाला भास म्हणालो, चुकले का हो… अशा त्यांच्या अनेक गझल मी गायल्या. इलाहींचा साधेपणा मनाला नेहमीच भावलाय, त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही अभिनिवेश नसे. मोठा गझलकार असल्याचाही आविर्भाव नसायचा. असा हा माझा मित्र, कुटुंबातला सदस्य मी आज गमावलाय.





























































